वार्ताहर / बोरगाव
वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे माणुसकी फाउंडेशनच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रास प्राथमिक स्टेजमध्ये असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांवर घरीच उपचार करण्यासाठी दोन ऑक्सिजन मशीनचे वाटप करण्यात आले.
कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमित लोकांची भर पडत आहे. यामुळे आरोग्य विभागावर मोठ्या प्रमाणात ताण पडला असून रुग्णांची संख्या जास्त असल्याने दवाखान्यात बेड, ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवरचा तुटवडा भासत आहे. परिणामी लोकांना बेड मिळत नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे रुग्ण घाबरून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर प्राथमिक स्टेजमध्येच उपचार होऊन रुग्ण बरा व्हावा या उद्देशाने माणुसकी फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जोपासून कोरोना झालेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाही किंवा मदत मिळत नाही अशा रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी दोन ऑक्सिजन मशीन दिल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात विनामूल्य प्राणवायू मिळणार आहे. यामध्ये होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णाला घरी जाऊन प्राणवायू देता येईल. यामुळे कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध होईपर्यंत त्यांचे जीवन वाचवण्यासाठी मदत होणार आहे.
यावेळी फाउंडेशनचे प्रमुख व राजारामबापू बँकेचे संचालक माणिकराव शामराव पाटील, विजय पाटील, संजय पाटील, मानसिंग शिंदे, विजयकुमार शिंदे, महेश सुतार, रामचंद्र डांगे, आरोग्य अधिकारी चेतना साळुंखे व माणुसकी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.








