जमावातील दोघांनी विनयभंग केल्याचीही तक्रार
प्रतिनिधी / सांगली
शहरातील नळभाग येथील गरीबनवाज मशिदीसमोर दोन लोकांच्यात भांडणे लागली होती. ती भांडणे सांगली शहर पोलीस ठाण्याकडील महिला पोलीस सोडवत होती. त्याठिकाणी असिफ बावा येवून त्याने या महिला पोलीसाला दमदाटी केली. तसेच बेकायदेशीर जमाव जमवून या महिला पोलीसांविरोधात वातावरण निर्माण केले. जमावातील दोघांनी या महिला पोलीसाचा विनयभंग केल्याचा आरोपही महिला पोलिसाने केला आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली याप्रकरणी या महिला पोलीसाने असिफ बावासह अन्य अनोळखी लोकांच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत हकीकत अशी की, शनिवारी रात्री गरीबनवाज मशिदीसमोर दोन लोकांच्यात भांडण सुरू असल्याची माहिती या महिला पोलीसाला प्राप्त झाल्यानंतर त्या हे भांडण सोडवत होत्या. त्याचदरम्यान संशयित असिफ बावा त्याठिकाणी आला आणि त्यानी या भांडण सोडवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी दमदाटी सुरू केली. त्यामुळे वातावरण बिघडले त्यामध्येच त्यांनी बेकायदेशीर जमाव गोळा केला आणि या जमावातील काही लोकांनी या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग केला. पोलीस त्याठिकाणी आल्यावर महिला पोलीसांनी याबाबतही हकीकत सांगितली त्यानंतर तात्काळ पोलीसांनी असिफ बावा याला ताब्यात घेतले. दरम्यान त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा या महिला पोलीसांने असिफ बावा आणि अन्य अनोळखी लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.








