प्रतिनिधी / इस्लामपूर
महापूराने दैना उडाली असून नदीकाठच्या गावांतील अनेक कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. या महापूराचा शुक्रवारी रात्री पासून पुणे-बेंगलोर द्रुत गती मार्गाला फटका बसला. कणेगाव जवळ वारणा नदीचे पाणी आणि कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पुलावर आल्याने प्रशासनाने वाहतूक रोखून धरली.
कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांना वाघवाडी फाटा येथून पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला. तर पुणेकडे जाणारी वाहने कोल्हापूर प्रशासनाने तिकडेच थांबवून ठेवली. त्यामुळे एका बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर पुणेकडे जाणारा मार्ग पूर्ण मोकळा होता. अनेक मालवाहतूक करणारे ट्रक, लक्झरी बसेस, खाजगी प्रवासी वाहने अडकून पडली आहेत.
कोरोनामुळे महामार्गलगतची हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद असल्याने ट्रक चालक, सहचालक यांच्यासह प्रवाशांचे पोटाचे हाल सुरु झाले आहेत. काही ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ, समाजसेवी संघटना यांनी चहा,नाष्टा पुरवला. पण सन २०१९ च्या महापुरात जितकी मदतीसाठी उत्स्फूर्तता होती, तितकी यावेळी दिसून येत नाही.








