प्रतिनिधी / सांगली
महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीच्या हरिदास पाटील यांची वर्णी लागली. स्थायी समितीच्या नऊ जागांवर नव्याने नऊ सदस्यांची निवड करण्यात आली. भाजपकडून कल्पना कोळेकर, जगन्नाथ ठोकळे, निरंजन आवटी, गजानन आलदर, काँग्रेसकडून संतोष पाटील, फिरोज पठाण तर राष्ट्रवादीकडून नर्गिस सय्यद, मनगूआबा सरगर व संगीता हारगे यांना संधी देण्यात आली. दरम्यान निवडीपूर्वी महापौर दिग्वीजय सूर्यवंशी यांनी सभा 15 मिनिटांसाठी अचानकच तहकूब केली.
त्यामुळे सभागृहात भाजप-काँगेस नगरसेवकांनी गोंधळ घातला. नगरसचिवांना खेचण्याचा तसेच जबरदस्तीने रोखून धरत खुर्चीवर बसविण्याचा प्रयत्न झाल्याने तणाव आणि गोंधळही वाढला. त्यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महापौरांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन ऍपद्वारे महासभा पार पडली. सभा ऑनलाईन असताना भाजप, काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱयांसह नगरसेवकांनी सभागृहातच उपस्थित दर्शवत शासन आदेशाचा भंग केला. सभेपुढे स्विकृत तसेच स्थायीतून निवृत्त होणाऱया सदस्यांच्या ठिकाणी नवे सदस्य निवडीचा विषय होता.
हा विषय समोर येताच सूर्यवंशी यांनी अचानक 15 मिनिटांसाठी सभा तहकूब केली. यामुळे भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, धीरज सूर्यवंशी, जगन्नाथ ठोकळे, संजय यमगरांसह अन्य सदस्यांनी महापौरांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र महापौर सभागृहातून बाहेर पडले. या सदस्यांनी नगरसचिवांना घेरुन त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला. जबरदस्तीने खुर्चीवर बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यामुळे सभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. काँग्रेसच्याही सदस्यांनी भाजपला अप्रत्यक्ष साथ दिली.
या साऱया गोंधळात नगरसचिवांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर सदस्यांनी नरमाईचे धोरण स्विकारत त्यांना शांत उभा रहा, असे सांगितले. मैनुद्दीन बागवान नगरसचिवांच्या मदतीला धावले. `आम्ही आहोत, तुम्ही खुर्चीवर बसा’ असे सांगत आडपेंना धीर देण्याचा प्रयत्न केला. 15 मिनिटांच्या तहकूबीनंतर सभेस सुरूवात करण्यात आली. प्रथम स्वीकृत सदस्याचे नाव जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादीचे गटनेते बागवान यांनी बंद लिफाफ्यामधून नाव महापौरांकडे दिले. यामध्ये हरिदास पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले.
त्यानंतर भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांनी स्थायासाठी चार नावे महापौरांकडे सुपूर्द केली. जगन्नाथ ठोकळे, निरंजन आवटी, गजानन आलदर व कल्पना कोळेकर यांना भाजपने संधी दिली. काँग्रेसचे गटनेते उत्तम साखळकर यांनी फिरोज पठाण व संतोष पाटील ही नावे दिली. राष्ट्रवादीकडून डॉ. नर्गिस सय्यद, संगीता हारगे व मनगूआबा सरगर यांना संधी मिळाली. स्थायीतील नव्या सदस्यांची नावे जाहीर केल्यानंतर महापौरांनी सभा संपल्याचे जाहीर केले.
शालेय समितीवरुन कॉग्रेस-राष्ट्रवादीत मतभेद
महापालिकेच्या मिरज हायस्कूलसाठी शालेय शिक्षण समितीची स्थापना करण्याचाही विषय होता. मात्र विषयपत्र अपूर्ण असल्यावरून हा विषय स्थगित ठेवण्यात आला. दरम्यान समितीमधील चार नावावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत एकमत न झाल्याने हा विषय प्रलंबीत ठेवल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरु होती. दरम्यान पंचतारांकित घरांना मालमत्ता करात 4 टक्के सूट देण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला.