प्रतिनिधी / सांगली
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी गीता सुतार तर उपमहापौरपदी आनंदा देवमाने यांची निवड झाली. महापौरपदाच्या निवडणुकीत सुतार यांनी काँग्रेसच्या वर्षा निंबाळकर यांचा ८ मतांनी पराभव केला. सुतार यांना ४३ तर निंबाळकर यांना ३५ मते पडली. दरम्यान, निवडीनंतर सुतार व देवमाने यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाचा जल्लोष केला.
जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात आयोजित विशेष महासभेत या निवडी पार पडल्या. महापौर संगीता खोत, उपमहापौर धिरज सूर्यवंशी यांनी राजीनामा दिल्याने नवीन महापौर, उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता.
भाजपकडून गीता सुतार यांनी महापौर पदासाठी तर आनंदा देवमाने यांनी उमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला होता. तर विरोधी काँग्रेस–आघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा निंबाळकर महापौरपदाच्या तर राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात उपमहापौर पदाचे उमेदवार होते.
सभेस ११.३० वाजता सुरवात झाली. प्रथम उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर अर्ज माघारी घेण्यास १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला. यादरम्यान, भाजपने विरोधी काँग्रेस–राष्ट्रवादीला अर्ज माघारी घेण्याची विनंती केली. मात्र आघाडीने नकार दिला. त्यामुळे थेट मतदान घेण्यात आले. भाजपच्या गीता सुतार यांना ४३ मते मिळाली तर वर्षा निंबाळकर यांना ३५ मते मिळाली. निंबाळकर यांचा ८ मतांनी पराभव झाला. उपमहापौर पदासाठी आनंदा देवमाने यांनाही ४३ मते मिळाली. त्यांनी राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांचा ८ मतांनी पराभव केला.
दरम्यान निवडी जाहीर होताच सुतार, देवमाने यांच्यासह भाजपच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. महापौर सुतार आणि देवमाने यांनी सांगलीचे आराध्य दैवत गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर शहरातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली.