प्रतिनिधी / सांगली
महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने आता जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकार्यांनी बैठकीत घेतला. बुधवार दि. ५ ते मंगळवार दि. ११ तारखेपर्यंत हा जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. या काळात शहरात दूध, दवाखाने, मेडिकलसह वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व अस्थापना बंद राहणार आहेत. शिवाय किराणा दुकानदार व भाजी विक्रेत्यांना यापुढे केवळ सकाळी सात ते अकरा या वेळेत होम डिलिव्हरी करता येणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांविरोधात तीव्र कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये व काही तालुक्यांमध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात देखील जनता कर्फ्यू लागू करावा, अशी मागणी काही संघटना व नगरसेवकांनी केली होती. यामुळे सोमवारी महापौर दिग्विजय सुर्यवंशी व आयुक्त नितीन कापडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमहापौर उमेश पाटील, स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, उपायुक्त राहुल रोकडे आदी उपस्थित होते. या बैठकीत सात दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.








