लकी ड्रॉ रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी, मुख्यमंत्र्यंlकडे धाव
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यातील अनेक शेतकरी मत्स्यशेती योजनेसाठी प्रतिक्षा यादीत आहेत. तरीही प्रशासनाने पुन्हा नव्याने अर्ज मागवले असून, त्यातून निवडी केल्याने जुन्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे ही निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
सांगली जिल्ह्यात मोठ्या संख्येने शेतकरी मत्स्यशेती करतात. त्यांच्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबवली जाते. गेल्यावर्षी या योजनेतून शेतकरी निवडले गेले. राहिलेल्या शेतकऱ्यांची प्रतिक्षा यादी बनवली गेली. या यादीतील शेतकऱ्यांना पुढील वर्षी लाभ मिळेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर्षी योजना राबवताना त्यांना डावलून पुन्हा नवे अर्ज मागवले. त्यातून लाभार्थ्यांची निवड गेल्या बुधवारी 9 रोजी लकी ड्रॉ पद्धतीने झाली. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील शेतकरी बाजुलाच पडले आहेत.
शेतकऱ्यांनी तक्रार केली की, संपूर्ण प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली गेली आहे. पुढील वर्षी संधी देण्यात येईल असे सांगितल्याने आम्ही लाखो रुपये खर्चून प्रकल्प राबवले. त्यासाठी बॅंकांकडून कर्जे घेतली. उधार, उसनवारही केली. यावर्षी निवड प्रक्रियेत डावलल्याने हे पैसे कसे फेडायचे ही चिंता लागून राहिली आहे. आमचे लाखो रुपये अडकून पडले आहेत.त्यामुळे लकी ड्रॉ रद्द करुन प्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांना न्याय द्यावा. नव्या शेतकऱ्यांना संधी देण्यापूर्वी यादीतील जुन्यांचाही विचार करा अशी मागणी त्यांनी केली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे आदी जिल्ह्यांत अशा शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.
बुधवारी झालेल्या लकी ड्रॉमध्ये डावलले गेल्याने त्यांनी शासनाकडे धाव घेतली आहे. लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. विजय कणसे, अविनाश जाधव, हेमलता घाडगे, सुजाता जाधव, गणेश निकम, मधुरा जाधव, सुरेखा चव्हाण, मुश्ताक मलबारी आदी शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल करुन लकी ड्रॉ रद्द करण्याची मागणी केली आहे. न्याय मिळाला नाही तर कायदेशीर दाद मागण्याचा इशाराही दिला आहे. हे शेतकरी शासनाकडे नियमित महसूल भरत असतानाही प्रशासनाने अन्याय केल्याची तक्रार आहे.