जाचक निकष नकोत : शंभर टक्के भरपाईची मागणीसाठी आंदोलनाचा इशारा
वार्ताहर / भिलवडी
भरपाईच्या जाचक निकषांमुळे पलूस तालुक्यातील भिलवडीसह दहा गावांतील पूरग्रस्त संतप्त झाले आहेत. शंभर टक्के नुकसान भरपाई न दिल्यास पलूस तहसीदार कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थ व शेतकर्यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापुराचा सर्वाधिक फटका पलूस तालुक्याला बसला आहे. भिलवडी, धनगाव, आमणापूर, बुर्ली, भुवनेश्वरवाडी, सुखवाडी, चोपडेवाडी, ब्रह्मनाळ, खटाव, अंकलखोप ही गावे पूर्ण पाण्यात बुडाली होती. हजारो एकरांतील सोयाबीन, भुईमूग, ऊस, केळी, हळद यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अनेकांच्या घरात पाणी गेल्याने पाया कमकुवत झाला आहे. काहींचे गोठे पडले आहेत. जनावरांचे स्थलांतर केले होते. यामुळे अनेक जनावरे आजारी पडली आहेत. काही जनावरे आटली आहेत. शेकडो एकरांतील द्राक्षबागा बुडाल्या आहेत. ढबूसह अन्य भाजीपाला पिके जागेवर कुजली आहेत. शेकडो व्यापार्यांच्या साहित्याची नासधूस झाली आहे. त्यामुळे सर्वांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.