विरोधी पक्ष नेत्यांचा मनपा आयुक्तांना इशारा
प्रतिनिधी/सांगली
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस मुख्यालयात न बसता मंगलधाम मधून कारभार हाकण्यास सुरवात केली आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी अशोभनीय भाषेत उत्तर दिले. यापुढे त्यांनी भाषा सुधारावी, अन्यथा त्याच भाषेत त्यांना उत्तर दिले जाईल असा सज्जड इशारा विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिला. सभागृहातनसभा झाल्यास सदस्य कारभाराचा पंचनामा करतील याच भीतीने आयुक्तांनी महासभा ऑनलाईन घेतली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.
साखळकर म्हणाले, आयुक्तांनी महापौर तसेच पदाधिकाऱ्यांची परवानगी न घेता स्वतःच्या मर्जीने मंगलधाममध्ये बैठक घेण्याचे गौडबंगाल काय? ते मुख्यालय सोडून मंगलधाम मध्ये का बसतात हे समजत नाही. मुख्यालयात बैठक का घेतली नाही असे विचारले असता त्यांना उत्तर देता आले नाही. यावेळी त्यांनी न शोभणारी भाषा केली. ते मनपाचे मालक असल्यासारखे वागत आहेत. त्यांनी भाषा सुधारली नाही, तर त्यांच्या भाषेत उत्तर देता येते हे लक्षात घ्यावे.
आयुक्त मंगलधाममध्ये का जातात, मुख्यालयात का बसत नाहीत? हे त्यांनी स्पष्ट करावे. त्यांनी मुख्यालयात बसल्याचे मान्य न केल्यास, आंदोलन करून त्यांना मुख्यालयात बसण्यास भाग पाडू, असा इशाराही श्री साखळकर यांनी दिला. महापालिकेची येत्या १७ डिसेंबर रोजी महासभा आयोजित केली आहे. मात्र ही सभाही ऑनलाईन होणार आहे. त्याचाही समाचार विरोधी पक्षनेते श्री उत्तम साखळकर यांनी घेतला. ते म्हणाले, ऑनलाइन सभा घेणे हाही मनमानी कारभार आहे. ऑफलाइन सभा झाल्यास सदस्य जाब विचारतील त्याला उत्तर देता येणार नाही. त्यामुळे कोरोनाचे कारण दाखवत ऑनलाइन सभा घेत आहेत. मात्र काल झालेल्या बैठकीत ४० नगरसेवक आणि अधिकारी बोलवले होते. मग ती बैठक ऑफलाइन का घेतली. तेथे कोरोनाचे नियम लागत नाहीत का? असा सवाल साखळकर यांनी केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








