सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांना व्यक्त केला संताप
समडोळीत अडीच एकर ढबूवर तणनाशक
प्रतिनिधी / सांगली
मिरज तालुक्यातील समडोळी व आष्टा परिसरातील फळ-भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची सोमवारी सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी भेट घेतली. या गावासह आष्टा परिसरातील आणि मिरज पश्चिम भागातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. बाजारपेठा बंद असल्याने शेकडो एकर भाजीपाला शेतातच पडून आहे. काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर तणनाशक मारले आहे. यापैकी काही शेतकऱ्यांची भेट घेऊन पृथ्वीराज यांनी परिस्थितीची माहिती घेतली.
अनेक शेतकर्यांनी ढबू, टोमॅटो आदी पिक घेतले आहे. बाजारपेठ बंद असल्याने कवडीमोल दराने तो माल विकावा लागत आहे. माल काढण्यासाठी महिला कामावर आहेत. त्यांचा पगारही त्या पैशातून भागत नाही. पाच रुपये किलोने तो विकावा लागत आहे. त्यात मोठे नुकसान म्हणजे, पिकलेला टॅामॅटो व ढबू पुढे जात नसल्याने तो शेतातच कुजण्यासाठी काढून टाकावा लागत आहे. त्यात हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. उत्पन्न सुरु होणार असे वाटत असतानाच बाजारपेठा बंद झाल्या. त्यामुळे पीक कुजून वाळू लागले आहे. शेकडो शेतकरी, भाजीपाला उत्पादक संकटात आहेत.
पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘सांगली शहरासह अनेक ठिकाणी भाजीपाला बाजार बंद आहेत. शेतकरी जगवण्याची जबाबदारी सरकारची आहे. आम्ही मदत मागत नाही तर शेतमाल खरेदीचे आवाहन करत आहोत. सरकारला हे शक्य आहे. काही काळासाठी डाळींचा वापर कमी करून भाजीपाला वापरल्यास शेतकऱ्यांना थोडा आधार मिळेल. त्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा कामाला लावावी. याबाबत निर्णय झाला नाही तर आम्हाला जिल्हाधिकारी व लोक प्रतिनिधी यांच्या कार्यालयासमोर आणून हा भाजीपाला टाकावा लागेल.’’ यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष महावीर चव्हाण, व्यवस्थापकीय संचालक अमोल पाटील आदी उपस्थित होते.








