प्रतिनिधी / शेडगेवाडी
शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील 75 वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत तर हा तालुक्यातील कोरोनाचा पाचवा बळी ठरला आहे.
येथील 75 वर्षीय महिलेला इस्लामपूर येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्या महिलेची परिस्थिती बिकट झाल्याने तिला मिरज येथील कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, याठिकाणी तिचा स्वॅब घेण्यात आला होता, तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले. या अगोदर याठिकाणी कोरोनाचे दोन रुग्ण सापडले असून ते बरेही झाले आहेत. त्याचबरोबर तिच्या घरातील सात लोकांना शिराळा येथील संस्थेमध्ये विलगीकरण करण्यात आले असून कुटुंबाच्या संपर्कातील लोकांची यादी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गावातील दूध संकलन केंद्राच्या मालकांनी दूध संकलनही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर गावातील सर्व दुकाने, उदयोग धंदे कडकडीत बंद करण्यात आले आहेत.

या घटनेनंतर तहसीलदार गणेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पाटील, कोकरूडचे वैद्यकीय अधिकारी घुले, तलाठी करिश्मा मुल्ला, ग्रामसेवक पाटील साहेब,आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांनी गावामध्ये उपाययोजना सुरू केल्या आहेत तर ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्याकडून गावामधील सोनार गल्लीमध्ये औषध फवारणी करण्यात आली आहे.








