प्रतिनिधी / सांगली
राज्यातील मंदिरे सुरू करून पुजारी आणि विविध वस्तू विक्रेत्यांची उपासमार बंद करा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीच्या वतीने येथील मारुती चौकात माजी आमदार नितीन शिंदे आणि माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.
‘बार चालू मंदिर बंद, हे धोरण करा बंद, आघाडी सरकारचा निषेध असो’ अशा घोषणा देत मारुती चौकात भाजप कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेकडो मंदिरे बंद ठेवली आहेत. त्यामुळे पुजारी आणि पुजा साहित्य विक्रेते त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आघाडी सरकारने दारू सम्राट आणि कारखानदार यांच्या फायद्यायासाठी मात्र बार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा भाजप अध्यात्मिक आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला असून, शासनाने मंदिर सुरू केले नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी दिला.
या आंदोलनाला नगरसेवक उर्मिला बेलवलकर, प्रियानंद कांबळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते घंटानाद आंदोलनात सहभागी झाले होते.








