रविवारी दिवसभर सावळा गोंधळ : आरोग्य केंद्रच राम भरोसे
वार्ताहर / बागणी
जिल्ह्यासह राज्यभर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ ही संकल्पना राबवली जात आहे. सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करण्यासाठी कडक धोरण हाती घेऊन न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाही देखील केली जात आहे पण या सर्व गोष्टींना तिलांजली देणारी गोष्ट पहायला मिळाली ती बागणी प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी दिवसभर या ठिकाणी लस घेण्यासाठी शेकडो ग्रामस्थ गर्दी करून होतो.

शनिवार व रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने त्यातच कडक लॉकडाऊन आणि तीन दिवस लस उपलब्ध झाली नसल्याने रविवारी लस घेण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. ना योग्य नियोजन, ना सोशल डिस्टन्स, ना मास्क आणि या ठिकाणी सॅनिटायझर देखील आढळून आले नाही. महत्वाची बाब म्हणजे शासनाने सुट्टीचे दिवस रद्द करून कामावर सर्वांनी ड्युटी लागेल त्या प्रमाणे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील या ठिकाणी रविवारी डॉक्टर कोणीच हजर नव्हते. येथील लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी अनेक तक्रारींचा पाढाच यावेळी वाचला. दररोज वेळेत डॉक्टरांसह कोणतेच कर्मचारी येथे उपलब्ध नसतात
कोरोनाच्या लढाईत बागणी प्राथमिक आरोग्य केंद्र पहिल्या टप्प्यात चांगले काम जिल्ह्यात चर्चेत होते पण सध्या मात्र कोणालाच काय घेणे देणे नाही अशीच परिस्थिती पहायला मिळत आहे. रविवारी संबंधित वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने इतर व्याधींचे आजारी पेशंट दिवसभर थांबून निघून गेले. असा सावळा गोंधळ सध्या पहायला मिळत आहे. कधी काळी याच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कौतुक जिल्हाधिकारी, पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी देखील केले होते. पण सध्या मात्र नावजलेला गुरू या म्हणी प्रमाणे याची अवस्था झाली आहे. कोणाचेही नियंत्रण नसल्या सारखे इथले नियोजन दिसून येत आहे. लस देताना देखील कोणतेही सुयोग्य नियोजन दिसून येत नाही. मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे यावर आता वरिष्ठांनी लक्ष घालून येथील कारभार पुन्हा सुधारावा अशी मागणी करण्यात येत आहे.








