करगणीवर शोककळा
प्रतिनिधी / आटपाडी
मुसळधार पावसामुळे तुडुंब वाहणाऱ्या बंधाऱ्यात बुडालेल्या करगणी (मानेवाडी) रामनगर येथील शुभम जाधव या तरुणाचा मृतदेह तीन दिवसांनी शनिवारी सापडला. रॉयल कृष्णा बोट क्लब सांगलीच्या सदस्यांनी अथक प्रयत्न करत हा मृतदेह शोधला. त्यामुळे तीन दिवस सुरू असणारी शोध मोहीम पूर्ण झाली.
आटपाडी तालुक्यात अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे ओढे, नाले, माणगंगा नदी दुधडी वाहत आहे. करगणी मानेवस्ती येथील शुभम जाधव हा तरुण गुरुवारी बंधाऱ्यात बुडाला. त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. आमदार अनिल बाबर, प्रांत संतोष भोर, तहसीलदार सचिन लंगुटे, पोलीस प्रशासन, सरपंच गणेश खंदारे यांनी शोध मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न केला.
स्थनिक तरुणांनी सातत्याने शोध केला. पण यश येत नव्हते. बुडालेल्या तरुणाच्या शोधासाठी सांगली वरून बोट व पथक बोलविण्यात आले. विविध पथकांनी शोध केला. तिसऱ्या दिवशी बंधाऱ्यापासून 1 किमी अंतरावर जाधव वस्ती येथे मृत शुभमचा मृतदेह सापडला. त्यानंतर आई व नातेवाईक यांनी हंबरडा फोडला. पाण्याच्या मोठ्या प्रवाहात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधणाऱ्या रॉयल कृष्णा बोट क्लब च्या सदस्यांचा करगणी ग्रामपंचायत तर्फे सरपंच गणेश खंदारे, माजी सरपंच तुकाराम जानकर, अभयसिंह पोकळे, रमेश माने, दत्तात्रय पाटील व मान्यवरांनी गौरव करत कृतज्ञता व्यक्त केली.