प्रतिनिधी / सांगली :
शिव प्रतिष्ठानच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सांगली बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सातारचे छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी सांगली बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला सांगली शहरातील स्टेशन रोड, राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती पेठ, कापड पेठ, शिवाजी मंडई, दत्त मारुती रोड, हरभट रोड, बस स्थानक रोड, या महत्वाच्या व्यापारी पेठांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.
दरम्यान प्रतिष्ठानच्यावतीने सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर संजय राऊत यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. या बंदमधून सर्व अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. काही महाविद्यालयांनी होणाऱ्या परीक्षा बंदमुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. या बंदमुळे शिवाजी मंडई येथे शुकशुकाट जाणवत होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सांगलीत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, महापौर संगीता खोत, भाजपचे मनपा नेते शेखर इनामदार, गटनेते युवराज बावडेकर, नगरसेवक सुबराव मद्रासी, लक्ष्मण नवलाई, संजय कुलकर्णी यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








