प्रतिनिधी / सांगली
महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या पुनर्रचनेचा ठराव नुकताच महासभेत घेण्यात आला आहे. नव्याने केलेली ही प्रभागांची पूर्णतः चुकीची व भौगोलिक सलग्नतेचा विचार न करता केलेली असून त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. त्यामुळे प्रभागांच्या नव्या रचनेच्या ठरावाचा फेरविचार करावा अन्यथा ठराव विखंडीत करण्यासाठी तक्रार दाखल करण्याचा इशारा सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष ॲड.अमित शिंदे यांनी दिला आहे.
याबद्दल बोलताना ॲड.अमित शिंदे म्हणाले की, महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये प्रभाग समित्यांच्या पुनर्रचनेचा ठराव सत्ताधारी व विरोधकांनी सर्वानुमते मंजूर केला आहे. यामध्ये प्रभाग समिती खाली येणाऱ्या प्रभागांमध्ये अन्यायकारक फेरबदल करण्यात आले आहेत. प्रभाग १९ हा पूर्वी प्रभाग समिती २ च्या कार्यालयास जोडण्यात आला होता. प्रभाग समिती २ चे कार्यालय देखील प्रभाग १९ च्या हद्दीमध्ये आहे. मात्र आताच्या ठरावानुसार प्रभाग १९ हा कुपवाड मधील प्रभाग समिती ३ च्या कार्यलयास जोडण्यात आला आहे. यामुळे अन्य प्रभागातील नागरिकांनी त्यांच्या कामासाठी प्रभाग १९ मध्ये कार्यालय असलेल्या प्रभाग २ मध्ये यायचे व विश्रामबाग मध्ये राहणाऱ्या नागरिकांना आता पालिकेतील कामांसाठी कुपवाडला हेलपाटे घालावे लागणार आहेत.
तसेच प्रभाग १४ व १६ अनुक्रमे गावभाग व खणभाग हा पूर्वी सांगली महापालिका कार्यालयातील प्रभाग समिती १ च्या कार्यलयास जोडला होता जो तेथील नागरिकांना जवळ व सोयीचा होता मात्र आताच्या ठरावानुसार हे प्रभाग विश्रामबाग येथील प्रभाग समिती २ च्या कार्यलयास जोडण्यात आले आहेत. त्यामुळे गावभाग व खणभागातील नागरिकांना पालिकेतील कामांसाठी आता विश्रामबागला हेलपाटे मारावे लागणार आहेत. हा या भागातील नागरिकांवर सत्ताधारी व विरोधकांनी जाणीवपूर्वक केलेला अन्याय आहे. यामुळे या प्रभागातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. ठराव करणारे पदाधिकारी ज्या नागरिकांच्या जीवावर निवडून आले त्यांनीच नागरिकांवर हा अन्यायकारक बदल लादला आहे. सत्ताधारी व विरोधकांनी मिळून स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी प्रभागातील नागरिकांना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न चालवला आहे.
त्यामुळे हा अन्यायकारक ठराव तात्काळ रद्द करून नागरिकांची गैरसोय टाळावी. नगरसेवकांनी नव्या प्रभाग रचनेबाबत फेरविचार करावा. अन्यथा याविरुद्ध नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवून कायदेशीर मार्गाने ठराव विखंडीत करण्यासाठी लढा उभारू.तसेच यासाठी पालकमंत्री नामदार जयंत पाटील यांची भेट घेऊन सत्ताधाऱ्यांनी शहाणपणाने वागण्याची समज द्यावी अशी मागणी करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.








