प्रतिनिधी / सांगली
भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी राज्य शासनाकडील दिलेल्या निर्देशानुसार दि. २२ ऑक्टोबर २०२१ पासून सांगली जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील चित्रपटगृहे सुरू करण्यास महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२०/प्र.क्र.६५/सां.का.१ दि. ११ ऑक्टोबर २०२१ अन्वये दिलेल्या मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी दिली आहे.
राज्य शासनाकडून तसेच जिल्हा प्रशासकनाकडून कोविड-19 बाबत वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करणे (उदा. मास्क परिधान करणे, शारिरिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे) बंधनकारक राहील. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, तालुका कार्यकारी दंडाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.








