वार्ताहर / कसबे डिग्रज
मिरज पश्चिम भागातील कसबे डिग्रज, मौजे डिग्रजसह पूरग्रस्त गावांना माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली. भेटी दरम्यान विविध पूरग्रस्त भागाची पाहणी करून घरपडझड, शेतीचे नुकसान, पंचनामे, लोकांच्या अडीअडचणी याची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, महापुरामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यावर नुकसानीचे पंचनामे चालू आहेत परंतू त्यात शासनाने जाचक अटी लावल्या आहेत. पुरकाळात शासनाच्या आदेशानुसार स्थलांतर केलेल्या सर्वांना सरसकट सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे. ऊस सोयाबीनसह शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला असताना शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस घोषणा केली नाही. शेतकऱ्यांना भरपाईबाबत कोणतीच घोषणा न केल्याने सरकारच्या भूमिकेवरच शंका आहे. पडझड झालेल्या घरांचे वस्तुनिष्ठ पंचनामे होऊन नुकसान भरपाई तसेच मोठी पडझड झालेल्या घरांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा. महापुराच्या या कठीण प्रसंगात मी लोकांच्या सोबत असून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्षाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.