दिघंची /वार्ताहर :
एकीकडे अतिवृष्टी होऊन कृष्णा नदीला पूर आला आहे तर आटपाडी तालुका अजून देखील मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे वाहून जाणारे पुराचे पाणी टेंभू योजनेच्या बंद पाईपलाईन मधून निंबाळकर तलावांमध्ये सोडावे व त्यामधून निंबाळकर तलाव, यादव वस्ती बंधारा, सागर मळा, डुक्कर खिळा पाझर तलाव हे भरून मिळेल अशी मागणी दिघंची ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच अमोल मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
टेम्भू योजनेचे दिघंचीकडे येणाऱ्या बंदिस्त पाईपलाईनचे काम पूर्णत्वास आले आहे.तसेच टंचाईच्या काळात टेंभूचे पाणी देखील निंबाळकर तलावात सोडण्यात आले होते.ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू लागल्यानंतर टेंभुच्या पाण्याने दिघंचीकरांची तहान भागवली होती.टेंभु योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन मधून येणाऱ्या पाण्यासाठी प्रसंगी नागरिकांनी रात्री जागवून राखण केली होती.
सध्या महापुराचे पाणी दुष्काळी तालुक्यांना देण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे.त्यामुळे दुष्काळी तालुक्यांना याचा फायदा होणार आहे.या पाण्यातून दिघंची मधील निंबाळकर तलाव,यादव वस्ती बंधारा,सागर मळा पाझर तलाव,डुक्कर खिळा पाझर तलाव भरून मिळावेत अशी मागणी दिघंची ग्रामपंचायत च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी निवेदन देताना मुन्नाभाई तांबोळी,संजय वाघमारे उपस्थित होते.








