राजकीय व सामाजिक संघटनांनी उभारली निवारा केंद्रे, आठशेहुन अधिक पुरग्रस्त घेताहेत लाभ
प्रतिनिधी / कुपवाड
जोरदार पावसामुळे कृष्णा नदीला आलेल्या महापुरातुन स्थलांतर करण्यात आलेल्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कुपवाडकरांचे हात सरसावले आहेत. शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्यावतीने निवारा केंद्रे उभारली असून आठशेहुन अधिक पुरग्रस्त नागरिक निवारा केंद्राचा लाभ घेत आहेत.

कुपवाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरसेवक विष्णु माने, शेडजी मोहिते, मुश्ताकअली रंगरेज, रविकुमार स्वामी, शहराध्यक्ष संजय तोड़कर यांच्या प्रयत्नाने सौ.आशालता उपाध्ये गर्ल्स हायस्कूल येथे पुरग्रस्तांची सोय केली आहे. कुपवाड शहर शिवसेना, आयुष सेवाभावी संस्था व सूरज फाउंडेशनतर्फे शहरप्रमुख अमोल पाटील व उद्योजक प्रविणचंद्र लुंकड यांच्यातर्फे नवकृष्णा व्हॅली शाळेत तर शहर संघर्ष समिती व व्यापारी संघटनेतर्फे अध्यक्ष सनी धोतरे व अमर दीडवळ यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद मराठी शाळेत पुरग्रस्तांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे.
सांगली क्षेत्रातील पुरग्रस्तांसाठी कुपवाड येथे जोरदारपणे मदतकार्य सुरु केले आहे. कुपवाडकरांनी पुरपुरग्रस्तांना शहरात सुरक्षित ठिकाणी निवारा केंद्र उभारून संकटातील लोकांना आधार दिला आहे. या सर्व ठिकाणच्या निवारा केंद्राच्या माध्यमातुन जवळपास आठशेहुन अधिक लोक लाभ घेत आहेत. त्यांच्यासाठी चांगल्याप्रकारे राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून दररोज सकाळी नाष्टा व चहा तसेच दुपारी व सायंकाळी उत्कृष्ठ जेवण, शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी विविध दानशूर व्यक्तीकडून मदतीसाठी चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध संघटनांनी मदतकेंद्र उभारल्याबद्दल कुपवाडमधील नागरिकांतुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. या मदत केंद्राला पालकमंत्री जयंत पाटील, आतुक्त नितीन कापडणीस, माजी आमदार प्रा.शरद पाटील यांसह विविध मान्यवरानी भेट देऊन पाहणी करून लोकांशी संवाद साधला. यावेळी अन्य पदाधिकारी उपस्थित होते.








