सांगली / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यामध्ये पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघ व्दिवार्षिक निवडणूक-2020 चे मतदान दि. 1 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, शांतता रहावी तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनाई आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. चौधरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या इमारतीपासून 200 मिटर सभोवतालच्या परिसरात खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.
दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटागटाने फिरण्यास व एकत्रित गटागटाने फिरणे व उभे राहण्यास मनाई केली आहे. झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक या संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली असून मतदान केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे. हा आदेश दि. 1 डिसेंबर 2020 सकाळी 06.00 वाजल्यापासून ते संबंधित मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील.








