कच्चा प्रारूप आरखडा तयार करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
प्रतिनिधी / पलूस
माहे डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदती संपणाऱ्या नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आरखडा तयार करण्याची कार्यवाही ता. २३ ऑगस्ट पासून सुरू करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पलूस पालिकेची मुदत डिसेंबर २०२१ मध्येच संपत असल्याने प्रभाग रचनेचे काम सुरू होणार आहे.
पलूस पालिकेची मुदत २६ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग रचनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. महाराष्ट्र पालिका व औद्योगिक नगरी सुधारणा अधिनियम २०२० नुसार पालिकेत बहुसंसदीय पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल. सध्या प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आरखडा ता. २३ ऑगस्ट पासूनच सुरू करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. नवीन रस्ते, पूल, इमारती आदि विचारात घेण्यात यावे. प्रभाग रचना व आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम लवकरच सुरू होत असल्याने पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना पलूसमध्ये वेग येणार आहे. सर्वच पक्ष, संघटना आता निवडणुकीच्या तयारीला लागणार आहेत..