प्रतिनिधी / पलूस
पलूस तालुक्यातील पूरबाधितांचे क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्यात आले असून येत्या काही दिवसात कृष्णा नदी काठावरील चोवीस गावांचे पंचनाम्याचे काम पूर्ण होणार आहे. आज अखेर पाच हजार, अठ्ठयाऐंशी हेक्टर शेतजमीनीचे पंचनामे करण्यात आले आहेत. अशी माहिती तहसिलदार निवास ढाणे यांनी दिली. कृष्णाकाठावरील पाच हजार हेक्टर क्षेत्रातील सुमारे १०३७४ शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे. तर ६६ हजार घरे पाण्यात राहिली होती तर ११०० रांची पडझड झाली आहे.
यामध्ये १५० दुकाने पाण्यात राहिल्याने याचेही पंचनामे करण्यात आले आहेत. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे, पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पलूस तालुक्यातील कृष्णानदीला महापूर आला. या महापूरामध्ये कृष्णाकाठावरील सुमारे चोवीस गावांना याचा जबर फटका बसला. घरे, दुकाने, शेती क्षेत्र पाण्याखाली राहिल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. महापूरादरम्यान पलूस तालुक्यातील बुर्ली, आमणापूर, दुधोंडी, दहयारी, तुपारी, घोगाव, भिलवडी, अंकलखोप, पुणदी, नागठाणे, नागराळे, ब्रम्हनाळ, सुखवाडी, औदुंबर, धनगाव, राडेवाडी सह चोवीस गावांना महापूराचा फटका बसला आहे.