पलुस / प्रतिनिधी
पलूस आमणापूर रस्त्यावर काँग्रेस गटनेते सुहास पुदाले यांच्या घराजवळ बिबट्या आढळून आल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. या भागात बिबट्या संचार करत असल्याचा आढळून आला आहे. त्यामुळे याला पकडण्याची मागणी नागरिकांतुन होत आहे. येथील अभियंता कनबरकर हे नेहमिप्रमाणे सायंकाळी सातच्या सुमारास पलूस आमणापूर रस्त्या वरून जात असताना त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी तात्काळ काँग्रेस गटनेते सुहास पुदाले व परिसरातील शेतकऱ्यांना सर्वांना माहिती दिली. शेतामध्ये हा बिबट्या आढळून आला. सुहास पुदाले यांनी ताबडतोब वनविभागाला माहिती दिली. या घटनेने परिसरातील शेतकरीही भयभीत झाले असून,. पलूस आमनापूर रस्त्यावर घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पकडून सुरक्षित अधिवासात सोडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.
शेतकरीवर्ग हा चांगलाच भयभीत झालेला आहे. सध्या रब्बीचा हंगाम हा जोरात सुरू असून शेतकरी रात्री-अपरात्री गहू, हरभरा पिकांना पाणी देण्यासाठी झगडत आहेत. अशाच परिस्थितीमध्ये आज या भागात बिबट्या आढळून आल्यामुळे सर्वच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बिबट्याला जेरबंद करेपर्यंत शेतकऱ्यांनी बिबट्याचा आढळून आला त्या भागात जाण्याचे टाळावे, तसेच सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







