प्रतिनिधी / मिरज
सभापती-उपसभापती निवडीवरुन भाजपा-महाआघाडीत झालेला राजकीय संघर्ष, विविध कामांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर करण्यात आलेले आरोप, सदस्यांमधील खडाजंगी अशात पाच वर्षे कधी लोटली हे समजलेच नाही. आज गुरूवारी पंचायत समितीची शेवटची सभा होताच गटतट, आरोप-प्रत्यारोप विसरुन सर्वच सदस्य भावूक झाले. त्यांनी शेवटची सभा आरोपी प्रत्यारोपांविना खुल्या वातावरणात खेळीमेळीत पार पडली. सभापती सौ. पूनम कोळी अध्यक्षस्थानी होत्या.
मिरज पंचायत समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच भाजपाच्या ताब्यात पंचायत समितीची सत्ता आली होती. भाजपाने दोन अपक्षांसह अपवाद वगळता शेवटच्या क्षणापर्यंत सत्ता टीकवून ठेवण्यात यश मिळविले. सभापती, उपसभापती पदाची सर्वांना संधी देताना भाजपा नेत्यांना काहीवेळा तारेवरची कसरत करावी लागली.
त्यातून महाआघाडीच्या सदस्यांशी संघर्षही झाला. महाआघाडीने काही वेळेस पाठींबा देण्याची भुमिका बजावण्याबरोबर उपसभापती निवडीत भाजपाला पराभूतही केले. या सत्ता स्पर्धेत एकमेकांची मने दुखावलीही होती. आजच्या शेवटच्या सभेत मात्र सर्वच सदस्यांनी पाच वर्षातील या सत्ता संघर्षाला मुठमाती देत प्रत्येक सदस्यांना भावी राजकारणासाठी शुभेच्छा दिल्या.








