कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक मंडळीच्या उपस्थितीत विसर्जनः पंचायतनच्या वाहनातून मुर्ती नेण्यात आली
प्रतिनिधी/सांगली
ना ढोल, ना ताशा, ना मिरवणूक, ना पानसुपारी, ना भक्तांची गर्दी. अशा स्थितीत सांगली संस्थानच्या गणपतीचे बुधवारी पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. निवडक मंडळीच्या उपस्थितीत दरबार हॉल येथे संस्थानच्या गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर पंचायतनच्या खासगी वाहनातून ही उत्सव मुर्ती नेण्यात आली. कृष्णा नदीच्या मध्यावरती आंबी यांच्या सजविलेल्या होडीतून या गणेशाचे पारंपारिक पध्दतीने विसर्जन करण्यात आले.
गेल्या शतकाच्याही आधीपासूनच सांगली संस्थानच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक ही पंचक्रोशीत अत्यंत प्रतिष्ठेची आणि मानाची मानली जाते. सांगलीच्या राजवाडय़ातील दरबार हॉल येथे संस्थान प्रमुखांच्या हस्ते गणपतीची आरती झाल्यानंतर मातब्बर मंडळींना पानसुपारी दिल्यानंतर, या गणेशाची विसर्जन मिरवणूक निघते. यामध्ये हत्ती, घोडे, उंट, वारकरी, बँड, ढोल पथक पूर्वी पालखीतून आणि आता रथातून श्रीची विसर्जन मिरवणूक अत्यंत थाटामाठात निघते. तसेच या मिरवणूकीपुढे काढण्यात येणारी सुबक रांगोळी ही या गणेश विसर्जन मिरवणूकीची वैशिष्ठय़े. पण यावर्षी मात्र कोरोनाने सर्वत्र हाहाकार केल्याने सांगली संस्थानने गणपती उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आधीच जाहिर केले होते. त्यानुसार दरबार हॉल येथे मुर्तीची प्रतिष्ठापना संस्थानचे प्रमुख श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन आणि त्यांच्या कुंटुंबियांच्या हस्ते विधीवत पुजा करून करण्यात आली होती. त्यानंतर पाच दिवस कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम याठिकाणी करण्यात आले नाहीत. तसेच विसर्जन मिरवणूक ही पारंपारिक पध्दतीला पूर्णपणे फाटा देवून साधेपणाने गणरायाचे विसर्जन करण्यात येणार असल्याचे संस्थानकडून आधीच जाहिर करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी ही विसर्जन मिरवणूक न काढता अत्यंत साधेपणाने या गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
दरबार हॉलमध्ये पटवर्धनांच्या हस्ते आरती
बुधवारी दुपारी प्रथेप्रमाणे संस्थानचे प्रमुख विजयसिंहराजे पटवर्धन, राणीसाहेब श्रीमंत राजलक्ष्मी पटवर्धन, पोर्णिमाराजे पटवर्धन यांच्यासह पटवर्धन यांचे कुंटुंबिय आणि संस्थानचे व्यवस्थापक व संस्थानच्या निवडक कर्मचाऱयांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. त्यानंतर गणरायाची मुर्ती गणपती पंचायतनच्या खासगी वाहनातून ती दरबार हॉल येथून राजवाडा, तेथून गणपती मंदिर येथे नेण्यात आली. त्याठिकाणी आरती झाली व तेथून ही मुर्ती सांगलीच्या सरकारी घाटावर नेण्यात आली. त्याठिकाणी आंबी यांच्या होडीत ठेवण्यात आली. होडीमधून कृष्णा नदीच्या मध्यावरती ही मुर्ती नेण्यात आली व विसर्जन करण्यात आली.
…तरी ही भाविकांची गर्दी
संस्थानने कोणतीही विसर्जन मिरवणूक काढणार नाही तसेच दरबार हॉल येथे कोणालाही परवानगी देणार नाही असे जाहिर केले होते. त्याप्रमाणे त्यांनी ते नियम पाळले पण भक्तांनी मात्र या विसर्जन मिरवणूकीला गर्दी केलीच होती. दरबार हॉलच्या बाहेरील बाजूस मोठय़ाप्रमाणात भाविक मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी उभे होते. तसेच विसर्जन ज्याठिकाणी होते त्या सरकारी घाटावरही भक्तांची गर्दी होती तसेच आयर्विन पुल ही भक्तांनी फुलून गेला होता. सूर्य मावळतीला जात असताना या गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन होताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करून या भक्तांनी संस्थानच्या गणरायाला भक्तीपूर्ण असा निरोप दिला.
पोलीस बंदोबस्त
संस्थानची मिरवणूक जरी नसली तरी भाविक याठिकाणी येणार याची खात्री पोलीस प्रशासनाला असल्याने पोलीसांच्याकडून दरबार हॉल, राजवाडा चौक, गणपती मंदिर तसेच सरकारी घाट याठिकाणी मोठयाप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.








