प्रतिनिधी / सांगली
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील खाजगी शिकवणी वर्ग बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे नुकसान झाले आहे. ऑनलाईन क्लासेससाठी काही मर्यादा येत आहेत. त्यामुळे ऑफलाईन क्लास घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती कोचिंग क्लासेस टीचर्स असोसिएशन अँड सोशल फोरम यांनी केली आहे. त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे खाजगी शिकवणी वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ऑफलाइन क्लासेस सुरू करण्यासाठी अटी व शर्ती घालण्यात आले आहेत. सदरची परवानगी ही फक्त इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या खाजगी शिकवणी वर्गाकरिता राहील. विद्यार्थ्यांमध्ये एका बेंचवर एक विद्यार्थी बसवण्यात यावा किंवा दोन खुर्च्या मध्ये एक खुर्ची विनावापर ठेवावे तसेच प्रत्येक वर्गखोली हवेशीर व 50 टक्के पेक्षा कमी असन क्षमतेने वापरावी, खाजगी शिकवणी वर्गाच्या प्रवेशद्वारावर उपस्थित प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचे अनिवार्यतेने थर्मल स्कॅनिंग करण्यात यावे, खाजगी शिकवणी क्लासमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रुमाल अथवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक असेल, सदरच्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मध्ये आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य ते शारीरिक अंतर राखणेबाबत नियम काटेकोरपणे पाळण्यात यावा, ताप, सर्दी, खोकला कोरोना सदृश लक्षणे असणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना खाजगी शिकवणी वर्गामध्ये प्रवेश देऊ नये.








