प्रतिनिधी / इस्लामपूर
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना परदेशातून व्हॉट्सॲपवर धमकी देण्यात आली आहे. याबाबत पाटील यांनी पोलीसांकडे अर्जाव्दारे चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणातील व्यक्तीसह त्याच्या पाठीराख्याचा शोध घ्यावा, अन्यथा न्यायालयात गुन्हा दाखल केला जाईल, तसेच पोलीसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने दखल न घेतल्यास वेगवेगळया मार्गानी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपाचे वाळवा तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी पत्रकार बैठकीत दिला.
मोरे म्हणाले, पाटील यांच्या व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांकावर दि.२२ जून २०२१ रोजी सायंकाळी ७.३६ व ७.४३ यावेळेत मेसेज करून त्यांना धमकी देण्यात आली आहे. ‘चंद्रकांत पाटलांच्या मागे लपून जयंत पाटलांवर वार करू नका.. वेट अँड वॉच’ अशा स्वरूपाचा हा मेसेज आहे. दरम्यान पाटील यांनी त्याच नंबरवर इंग्लिशमध्ये ‘सर नंबर कुणाचा ?” असा मेसेज केला. पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही. या मेसेजमध्ये चंद्रकांत पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा उल्लेख करुन अपमान केला आहे. पाटील यांच्या राजकीय विरोधकांनी हा मेसेज केला असेल असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र दि. २७ जून रोजी इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे अर्ज करून चौकशीची मागणी केली.
पोलीसांनी याप्रकरणी अद्याप गांभीर्याने दखल घेतलेली नाही. हा प्रकार सुसंस्कृत वाळवा तालुक्याच्या दृष्टीने कलंक लावणारा असल्याचे सांगून मोरे म्हणाले, नगरपालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता गेल्यापासून पाटील यांना वेगवेगळया मार्गानी त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांच्या आरोग्य संस्थांमध्ये ढवळाढवळ करून जाणून-बूजून त्रास दिला जात आहे. दरम्यान भाजपाचे मधुकर हुबाले, चंद्रकांत पाटील, सतेज जयवंत पाटील यांनीही या मागील बड्या माशाचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी केली.यावेळी संदीप सावंत, दादासाहेब रसाळ हे उपस्थित होते.








