प्रतिनिधी / सांगली
शनिवारी जिल्हय़ात कोरोनाचे 252 नवीन रूग्ण वाढले, तर 155 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रात 180 रूग्ण वाढले तर ग्रामीण भागात 72 रूग्ण वाढले आहेत. शनिवारी नऊ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यातील सांगली शहरातील चार तर मिरज शहरातील तीन महिलाचा मृत्यू झाला आहे. जिल्हय़ात आतापर्यंत एकूण 136 जणांचे बळी गेले आहेत.
सांगली महापालिका क्षेत्रात 180 रूग्णांची वाढ
सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शनिवारी 180 नवे रूग्ण महापालिका क्षेत्रात वाढले आहेत. यामध्ये सांगली शहरात 133 तर मिरज शहरात 47 नवे रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात मोठयाप्रमाणात सुरू असलेल्या रॅपीड ऍण्टीजन टेस्टमुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. पण महापालिकेने मात्र यातील ज्या रूग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत तसेच सौम्य लक्षणे आहेत त्यांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. तसेच ज्यांना घरात सोय करता येत नाही त्यांना कोअर केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. पण ज्या रूग्णांना कोरोनाचा त्रास होत आहे. त्या रूग्णांना मात्र हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सांगलीत विश्रामबाग, गावभाग, खणभाग, शंभर फुटी रोड, शामरावनगर, हनुमाननगर, तसेच विविध उपनगरीय भागातील रूग्ण वाढले आहेत. तर मिरज शहरात वाढलेले रूग्ण हे गावठाण सह उपनगरी भागात मोठयाप्रमाणात आहेत. आज अखेर सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या दोन हजार 722 इतकी झाली आहे.
ग्रामीण भागात 72 रूग्ण वाढले आहेत
जिल्हय़ातील ग्रामीण भागात मात्र महापालिका क्षेत्राच्या मानाने रूग्णसंख्या कमी प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागात फक्त 72 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यात 15, जत तालुक्यात तीन, कडेगाव तालुक्यात सहा, कवठेमहांकाळ तालुक्यात सात रूग्ण वाढले आहेत. मिरज तालुक्यात मात्र मोठयाप्रमाणात रूग्ण वाढले आहेत. याठिकाणी 21 रूग्ण वाढले आहेत. तर पलूस तालुक्यात 3 रूग्ण वाढले आहेत. शिराळा तालुक्यात 7 रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात 3, वाळवा तालुक्यात 7 रूग्ण वाढले आहेत. असे एकूण 72 रूग्ण वाढले आहेत.
नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
जिल्हय़ात नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही मात्र चिंतेची बाब बनत चालली आहे. यामध्ये सांगली शहरातील चार व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 76 वर्षीय महिलेचा विवेकानंद हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. तर 59 वर्षीय व्यक्तीचाही विवेकानंद हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 70 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. तर 49 वर्षीय व्यक्तीचा वॉनलेस हॉस्पिटलमध्ये मृत्य़ू झाला आहे. मिरज शहरातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 27 आणि 73 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 65 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यातील बावची येथील 80 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात तर कासेगाव येथील 45 वर्षीय व्यक्तीचा विवेकानंद हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या नऊ जणांच्या मृत्यूने जिल्हयात कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या आता 136 झाली आहे.
जिल्हय़ात विक्रमी 155 रूग्ण कोरोनामुक्त
जिल्हय़ात शनिवारी विक्रमी 155 जण कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्वांच्यावर दहा दिवस कोरोनाचे पूर्ण उपचार झाल्यानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचे मोठय़ाप्रमाणात रूग्ण बरे होत असल्याने कोरोनाने बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या आता 1938 झाली आहे.
एकूण रूग्णसंख्या चार हजार 448 वर
गेल्या आठवडय़ापासून कोरोना रूग्णांची संख्या मोठय़ासंख्येने वाढत चालली आहे. त्यामुळे एकूण कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. शनिवारी कोरोना रूग्णांची संख्या आता साडेचार हजाराच्या आसपास आली आहे. एकूण रूग्णसंख्या आता चार हजार 448 झाली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 4448
बरे झालेले 1938
उपचारात 2374
मयत 136








