प्रतिनिधी / मिरज
रामकृष्ण या कंपनीच्या करंट बँक खात्याचा कोरा धनादेश आणि आरटीजीएस पावती चोरून 20 लाख रुपयांची रक्कम हडपली असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मधूकुमार (रा. माहेश्वर निवास, सांगली) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून, चंद्रकांत रामू मैगुरे नामक व्यक्तीच्या बँक खात्यावर सदरची रक्कम वळवली असल्याचे मधूकुमार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मधूकुमार यांची रामकृष्ण नावाने कंपनी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये या कंपनीचे करंट बँक खाते आहे. सही केलेला कोरा धनादेश आणि एक आरटीजीएस पावती ठेवली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. सदरची आरटीजीएस पावती आणि कोरा धनादेश वटवून चंद्रकांत रामू मैगुरे नामक व्यक्तीच्या आयडीबीया बँक मिरज शाखेमध्ये 20 लाख रुपयांची रक्कम वळविण्यात आली. तसेच सदर व्यक्तीने रक्कम वळविल्यानंतर ती काढून घेतली असल्याचे मधूकुमार यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.








