कर्मचारी सहभागी होणार
खासगीकरण व कंत्राटीकरण विरोधात 26 रोजी संप
प्रतिनिधी / सांगली
सरकारी योजनांचे कंत्राटीकरण आणि खासगीकरणाच्या धोरणास तीव्र विरोध करण्यासाठी देशपातळीवरील दहा प्रमुख संघटनांनी 26 रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. संपात देशातील 80 लाख, राज्यातील 17 लाख कर्मचारी सहभागी होतील. तसेच सांगली जिल्ह्यातील 35 हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याची राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पुणे विभाग सचिव पी. एन. काळे, जिल्हाध्यक्ष जे. के. महाडिक आदींनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, श्रमिकांच्या कायद्यात हानीकारक बदल करून त्यांना देशोधडीला लावण्याचा सरकारचा डाव आहे. सरकारी योजनांचे कंत्राटीकरण आणि खासगीकरण करून सेवा देण्याचा घाट घातला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार झपाट्याने कंत्राटी व मानधनावरील कर्मचारी नियुक्त करत आहे. त्यामुळे या धोरणाला तीव्र विरोध करण्यासाठी देशातील 10 प्रमुख संघटनांनी 26 रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. राज्यातील 17 लाख कर्मचारी संपात सहभागी होतील. सांगली जिल्ह्यातील देखील सरकारी, निमसरकारी असे 35 हजार कर्मचारी संपात सहभागी होतील. या दिवशी प्रत्येक कार्यालयासमोर सकाळी 11 ते 2 या वेळेत निदर्शने होतील. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साडे बारा वाजता निदर्शने केली जातील.







