प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यातील टेंभू व म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज, जत, मंगळवेढा, सांगोला या तालुक्यांना कृष्णा नदीतील चालू पावसाळी हंगामातील अतिरिक्त पाणी वळवून दुष्काळी भागात दिले जाणार आहे. हे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी पुढील काळात उपयुक्त ठरणार आहे. पालक मंत्री जयंत पाटील यांनी रविवार 15 ऑगस्ट रोजी सांगलीत ही माहिती दिली.
टेंभू योजनेच्या माध्यमातून आटपाडी, कवठेमहांकाळ, सांगोला या तालुक्यासाठी १.५ टीएमसी पाणी उचलण्यात येणार असून साधारणतः ७४ लघु प्रकल्प भरले जाणार आहेत. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यासाठी अंदाजे २ टीएमसी पाणी उचलण्यात येणार असून साधारणतः १५० लघु प्रकल्प व साठवण तलाव भरले जाणार आहेत.सांगली जिल्ह्याला पुढील काळात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासन सर्व शक्य गोष्टी करत आहे. असेही ते म्हणाले.