मुख्य बाजारपेठ बनली कंटेनमेंट झोन,दिघंची गावात प्रथमच शिरकाव
दिघंची / वार्ताहर
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील एका महिला डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. दिघंचीच्या मध्यवर्ती भागात दवाखाना असणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी इचलकरंजीमधुन आलेल्या एकाला कोरोना झाला असल्याने दिघांची मधील रुग्णांची संख्या दोन झाली आहे. यापूर्वीचा रुग्ण गावाबाहेर विलगिकरन कक्षात होता. परंतू आता प्रथमच गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
यावेळी आटपाडी चे तहसीलदार सचिन लंगूटे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे विनायक पवार यांनी तातडीने दिघंचीला भेट दिली.दवाखान्यातील दाखल रुग्णांना दवाखान्यातच देखरेख खाली ठेवण्यात आले असून दवाखान्यात विलगिकरन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य बजारपेठेमधील भाग सील करण्याच्या सूचना तहसीलदार यांनी दिल्या आहेत.सदर दवाखान्यात राजेवाडी,उंबरगाव, लिंगीवरे,विठलापूर,लोटेवाडी, पलसखेल,आवळाई आदींसह परिसरसतील वाड्या वस्त्यावरील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे डॉक्टरांना कोरोना ची बाधा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर महिला डॉक्टरांच्या संपर्कात असणाऱ्या कुटुंबांमधील व दवाखान्यातील कर्मचारी असे एकूण 18 जणांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात येणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ विनायक पवार यांनी सांगितले. तर संपर्कातील लोकांची माहिती घेऊन त्यांना विलगिकरन करून त्यांची तपासणी केली जाणार आहे.
मुख्य बाजारपेठच कंटेन्मेंट झोन
दिघंची गावची बाजारपेठ ही आटपाडी तालुक्यातील मोठी बाजरपेठ आहे.कोरोना ची बाधा झालेल्या डॉक्टरांचा दवाखाना गावच्या मध्यवर्ती भागात असल्याने मुख्य बाजारपेठेचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.त्यामुळे मुख्य बाजारपेठ 28 दिवस बंद राहणार आहे.