धनगांव – बुरुंगवाडी दरम्यान कॅनॉल जवळ घडली घटना
वार्ताहर / भिलवडी
पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी धनगांव दरम्यान लाकूड तोड करून, कोळसा बनविणाऱ्या आदिवासी कुटुंबातील महिलेचा पतीनेच खून करून फरार झाल्याची घटना आज दि.१८ सप्टेंबर २०२१ रोजी उघडकीस आली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गणपत पवार वय वर्ष ५० व त्याची पत्नी कांताबाई गणपत पवार वय वर्षे अंदाजे ४० मुळगाव सडोली ता.मावळ,जि.पुणे हे धनगाव बुरूंगवाडी दरम्यान कॅनॉलवर असणाऱ्या सदाशिव भिमराव चव्हाण यांच्या पडिक शेतातील काटेरी झाडांची लाकूडतोड करून कोळसा बनविण्याचे काम करीत होते. दि. १७ सप्टेंबर रोजी दोघेही नवरा बायको बुरुंगवाडी येथे बाजार करण्यास गेले होते. बाजार करून रात्री उशिरा ते परतले होते. रात्रीतच त्या दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाल्याने गणपत पवार याने पत्नी कांताबाई हिला काठीने मारहाण केली व त्यातच तिचा मृत्यू झाला.