पदाधिकारी बदलाला बेक : अंतर्गत गटबाजी आणि समन्वयाच्या अभावामुळे मनपात पायउतार
सुभाष वाघमोडे / सांगली
महापालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडीवेळी अंतर्गत गटबाजी आणि समन्वयाच्या अभावामुळे भाजपला सत्ता गमाविण्याची वेळ आली. बहुमताचा आकडा असतानाही सत्तेचा अस्त झाला. आता हीच खेळी जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाच्यावेळी विकास महाआघाडीच्या नेत्यांनी केल्यास तेथेही सत्ता गमावण्याची वेळ भाजपवर येणार आहे. मनपातील दणक्यामुळे जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल थांबविणे हाच भाजपसाठी शहाणपणाचा निर्णय ठरु शकतो.
महापालिकेत सत्ताधारी भाजपकडे पूर्ण बहुमत म्हणजे तब्बल 43 सदस्यांचे संख्याबळ असताना महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत पराभव भाजपला स्वीकारावी लागला. एकमुखी नेतृत्व नसणे, कोणाचा पायपोस कोणाला नसणे, आम्ही म्हणतो तसेच झाले पाहिजे, मला नाहीतर कुणालाही नाही, अशी भूमिका भाजपला नडली. दुसऱया बाजुला राज्यातील विकास महाआघाडीच्या सत्तेमुळे आणखीनच जवळ आलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही आलेल्या संधीचा पुरपुरे फायदा उठवत बहुमतासाठीच्या आकडÎाची जुळवाजुळव करत अडीच वर्षांतच भाजपकडील सत्ता काढून घेतली.
या घडामोडीत भाजपमधील गोंधळ आणि आघाडीतील एकी दिसून आली. प्रथम राज्यातील सत्ता, नंतर पदवीधरमधील विजय आणि आता मनपाची सत्ता, या एकामागून एक सकारात्मक गोष्टी घडत गेल्याने महाआघाडीचे नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आगामी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी निवडी आणि पंचवार्षिक निवडणुकांमध्ये हाच फार्म्युला राबविला जाणार हे पक्के झाले आहे. याचा पहिला प्रयोग जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीमध्ये होण्याची शक्यता आहे. तेथे विद्यमान पदाधिकाऱयांची मुदत संपल्याने नव्याने निवडी करण्याची मागणी काही इच्छुक सदस्यांनी नेत्यांकडे केली आहे. महापौर निवडीनंतर निर्णय घेणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील यांनी स्पष्ट केले होते.
मनपात पूर्ण बहुमत असताना सत्ता गेली, मग काठावर बहुमत असलेल्या जिल्हा परिषदेत काय होणार हे सांगण्याची आवशकताच नाही. त्यात शिवसेना राज्याच्या सत्तेच्या फार्म्यूल्यामुळे भाजपबरोबर राहणार नाही, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास भाजपचे पाच सदस्य कमी होतात. याशिवाय दोन अपक्ष आणि काही नाराजामुळे भाजपकडे बहुमताचा असलेला आकडा 30 च्या आत येऊ शकतो. तसे झाल्यास भाजपची जिल्हा परिषदेतीलही सत्ता जाणार हे स्पष्टच आहे. पदाधिकारी बदलाचा निर्णय भाजप सहजासहजी घेणार नाही. त्यामुळेही द्विधा परिस्थिती भाजपसमोर उभी राहणार आहे. बहुमताचा आकडा असला तरी अंतर्गत गटबाजी, संघर्ष, नाराजी यामुळे प्रथमच जिंकलेल्या स्थानिक स्वराज्यसंस्था घालविण्याची वेळ भाजपवर आली आहे.
| जि.प.मधील पक्षीय बलाबल भाजप 26 राष्ट्रवादी 15 काँग्रेस 8 रयत आघाडी 4 शिवसेना 3 स्वाभिमानी 1 |








