प्रतिनिधी / कडेगाव
कोरोना महामारीपासून गाव वाचविण्याची जबाबदारी त्या-त्या गावातील ग्राम दक्षता समितीची आहे. त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. तर ज्या गावांतील ग्राम दक्षता समिती व सरपंच यामध्ये हलगर्जीपणा करतील त्यांची आता गय केली जाणार नाही. असा इशारा कडेगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिला. कडेगाव येथे पंचायत समिती कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविणेबाबत आयोजित बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी बोलत होते.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती मंगल क्षीरसागर, उपसभापती आशिष घार्गे, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, गटविकास अधिकारी दाजी दाईगडे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक आहे. अशा परिस्थितीत पुन्हा ग्राम दक्षता समिती व गावांतील सरपंच यांनी पुर्ण क्षमतेने काम केले पाहिजे. गृह विलगीकरणात असलेले व घरी उपचार घेणारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे घराबाहेर पडणार नाहीत.तसेच जेथे कंटेन्मेंट झोनमधील लोक नियमांचे पालन करीत आहेत का हे सर्व पाहण्याची जबाबदारी आता ग्राम दक्षता समितीची व त्या गावातील सरपंच यांचेवर. तेव्हा ग्राम दक्षता समिती व सरपंच यांनी प्रभावीपणे काम केले तरच कोरोना हद्दपार होणार आहे.
कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी गावागावातील ग्राम दक्षता समिती व सरपंच यांची महत्वाची भूमिका आहे. ते कार्यक्षमपणे काम करीत आहेत की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक तालुक्यात लोकप्रतिनिधी व खातेप्रमुख अधिकारी यांचे संयुक्त पथक तयार केले जाणार असून या पथकाचा सरपंच व ग्राम दक्षता समितीवर वॉच राहील असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या शांता कनुजे,ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी आशिष कालेकर,सहायक पोलिस निरीक्षक,संदीप साळुंखे,संतोष गोसावी,नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप, विस्तार अधिकारी श्री.लोहार आदी मान्यवर उपस्थित होते.