म्हैसाळ योजनेच्या जत कालवा नऊची यशस्वी चाचणी : साडेचार हजार एकर क्षेत्र ओलीताखाली
सात गावे आणि वीसहून अधिक वाड्यावस्त्यांचा दुष्काळ हटणार
सुभाष वाघमोडे / सांगली
तब्बल 25 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जत तालुक्यातील पूर्वभागात कृष्णेचे पाणी आले आहे. म्हैसाळ योजनेच्या जत कालवा क्र. नऊची शुक्रवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. तालुक्यातील शेवटच्या टेकापर्यंत म्हणजे पाणी उमदीपर्यंत पोहोचले. या पाण्यामुळे सुमारे साडेचार हजार एकर क्षेत्र ओलीताखाली येणार असून सात गावे आणि वीसहून अधिक वाडÎावस्त्यांचा कायमस्वरूपी दुष्काळ हटणार असल्याने या भागातील जनतेमध्ये मोठे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बाराही महिने दुष्काळी असलेल्या जत तालुक्यासाठी 1995-96 मध्ये युती शासन असताना म्हैसाळ योजनेला मंजुरी देण्यात आली. कृष्णेतून पाणी उचलून मिरज पूर्वभाग, कवठेमहाकांळ, सांगोला, मंगळवेढा आणि जत या तालुक्यासाठीची ही योजना होती. ज्या वेळी योजनेला मान्यता देण्यात आली त्यावेळी योजनेचे पाचच टप्पे होते, जत पर्यंतच पाणी जाणार होते, मात्र त्यानंतर लोकांच्या मागणीनुसार टप्पे वाढविण्यात आले. जत पूर्व भागासाठी जत कालवा क्र. आठ आहे. या टप्पातून पाणी निगडी, येळवी, घोलेश्वर, येथून मंगळवेढा तालुक्यातील पडळकरवाडी तलाव आणि तलावात पाण्याचा साठा करून कालवा क्र. नऊ लकडेवाडी येथून बंदिस्त पाईपलाईनव्दारे थेट जत तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे उमदीपर्यंत पाणी नेण्यात आले आहे. साडेपंचवीस किमी आणि सुमारे 22 कोटी खर्चून योजनेचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
या कालव्याला 2012-13 मध्ये मंजुरी देण्यात आली असली तरी युती शासनाचा अखेरचा कालावधी आणि आत्ता महाविकास आघाडीच्या कालावधीत कामाला गती मिळाली. काम सुरू झाल्यानंतर फक्त दोन वर्षात योजनेचे शंभर टक्के काम पूर्ण करून शुक्रवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. या योजनेमुळे जत पूर्व भागातील लकडेवाडी, बंडगरवाडी, खिलारवाडी, लोखंडेवस्ती, गारळेवाडी नंबर एक व दोन, मुचंडी वस्ती, बिराजदार वस्ती, तेली वस्ती, पुजारवस्ती, उटगी, लमाणतांडा, निगडी, कारंडेवाडी, कोडगवस्ती, शिंदेवस्ती आदी वाडयावस्त्यासह उमदी या गावांतील सुमारे एक हजार 746 हेक्टर म्हणजे साडेचार हजार एकरवर क्षेत्र ओलीताखाली येणार असून या गावांचा वर्षानुवर्षे सुरू असलेला पाण्याचा प्रश्न यामुळे निकाली लागला आहे.
पूर्वभाग होणार टँकरमुक्त
या योजनेची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आता ही योजना दुष्काळी पूर्व भागातील पाण्याचा कायमचाच प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या टप्प्यात तालुक्यातील मोठा असलेला निगडी येथे दोड्डानाला मध्यम प्रकल्प आहे. याशिवाय अनेक छोटे-मोठे पाझर तलाव आहेत. उन्हाळ्यामध्ये एक आवर्तन सोडले तरी या भागातील विहिरी, कुलनलिकांची पाणीपातळी वाढणार असून यामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी होणारी धावाधाव थांबणार आहे. शिवाय भाग टँकरमुक्त होणार आहे.
दोन वर्षात योजना पूर्ण केली : मासाळ
निधीअभावी वारंवार योजनेचे काम रखडले, योजनेला आठ वर्षापूर्वी मंजुरी मिळाली असली तरी अवश्यक निधी येत नसल्याने योजनेचे काम रखडले होते, मात्र गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत पुरेसा निधी आल्याने गतीने कामे पुर्ण करण्यात आली. आता चाचणीही यशस्वी झाली असून योजनेवरील सर्व अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार, शेतकरी यांच्या सहकार्यामुळे योजना पूर्ण करता आल्याचे उपविभागीय अधिकारी म्हैसाळ प्रवेश कालवा जतचे अभिमन्यू मासाळ यांनी सांगितले.
दिलेला शब्द पाळला : आमदार सावंत
जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेचे काम वर्षानुवर्षे रखडले होते. मात्र आमदार झाल्यापासून वारंवार शासन पातळीवर पाठपुरावा करून निधी आणला, अधिकारी, ठेकेदार यांच्या पाठपुरावा करून कामाला गती आणली. आज टप्पा क्र. नऊचे पाणी तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचल्याचा आनंद आहे. जनतेला दिलाला शब्द पाळला आहे. देवनाळ मेंढेगिरीच्या टप्पाचे काम अपूर्ण असून तेही दोन महिन्यात पूर्ण करून त्या भागालाही पाणी मिळेल. म्हैसाळचे पाणी तालुक्यात आल्याने हजारो हेक्टर जमिन ओलीताखाली येणार असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे. या पाण्यामुळे दुष्काळी जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया जतचे आमदार विक्रमदादा सावंत यांनी दिली.