प्रतिनिधी / मिरज
विविध गुन्ह्यांमध्ये चार जिल्ह्यातून तडीपार केले असताना आदेश डावलून मोकाट फिरणाऱ्या प्रवीण रावसाहेब सुतार (वय 22, रा. पाटील वस्ती, लिंगनूर) य आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली. तालुक्यातील लिंगनूर येथे ही कारवाई करण्यात आली.
प्रवीण याच्यावर मिरज शहर पोलीस ठाणे, महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार त्याला सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यातून तडीपार केले होते. मात्र, आदेश डावलून तो मोकाट फिरत होता. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना सदर आरोपी लिंगनूर येथे एसटी स्थानकावर मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.








