मोठ्या भावासमोरच लहान भावाचा दुर्दैवी अंत
प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील टाकळी येथे शेतात मोठ्या मित्रांबरोबर खेळत असताना पाय घसरुन विहिरीत पडल्याने शेतमजूराच्या चार वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू झाला.अरुण शंकर दोडमनी वय 4 असे मृत झालेल्या बालकाचे नांव आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मोठ्या भावासमोरच लहान भावाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिरज ग्रामीण पोलिस आणि घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी, टाकळी गावातील आंबेडकरनगर येथे राहणारे शंकर दोडमणी हे शेतमजूरी करतात. त्याच्या घरापासून काही अंतरावर सुरगोंडा पाटील यांचे शेत आहे. या शेतातच एक पडकी विहिर आहे. शुक्रवारी सकाळी शंकर दोडमणी हे शेतात काम करीत असताना त्यांचा लहान मुलगा अरुण आणि मोठा मुलगा ऋत्विक हे दोघे मित्रासोबत खेळत होते. खेळत-खेळत ते विहिरीजवळ आले. विहिरीच्या कठड्यावरील शेवाळामुळे पाय घसरल्याने अरूण दोडमणी हा पाण्यात पडला. सदरची घटना घडली त्यावेळी विहिरीजवळ घरातील कोणीही मोठी व्यक्ती नव्हती. अरुण हा विहिरीतील पाण्यात बुडाल्याचे कळताच त्याचा मोठा भाऊ ऋत्विक आणि मित्र विहिरीजवळून घाबरुन पळून गेले.
त्यानंतर तब्बल दोन तासानंतर ऋत्विक याने सदरची घटना त्याच्या आजीला सांगितली. घरच्यांनी विहिरीकडे धाव घेतल्यानंतर अरुण या बालकाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेत मजुराचा लहान मुलगा शेतात खेळत असताना विहिरीत पडून मोठय़ा भावासमोरच त्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.








