प्रतिनिधी/मिरज
ज्येष्ठ रंगकर्मी आणि ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे कार्यवाह शफी नायकवडी (वय ५७) यांचे अल्पशा आजाराने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने नाट्य पंढरी सांगलीतील एक सच्चा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
शफी नायकवडी यांनी कॉलेज जीवनापासून रंगभूमीवर विविध एकांकिका आणि नाटकांमध्ये सहभाग घेतला. नाट्य पंढरी सांगलीतील विविध नाट्यसंस्थांशी त्यांचे निकटचे संबंध होते. विविध नाटकात त्यांनी दर्जेदार भूमिका केल्या. राज्यस्तरीय नाटयस्पर्धांमध्ये उत्कृष्ठ अभिनयाबद्दल त्यांनी परितोषकेही पटकावली होती.
सांगलीत नाट्यचळवळ रूजावी, यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून मोलाचे कार्य केले. परिषदेच्या चिंतामणीनगर शाखेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या शाखेच्या माध्यमातून अनेक वर्षे बालनाटय शिबीर, सुगम संगीत, भावगीत स्पर्धांचे आयोजन त्यांनी केले. नाट्य प्रशिक्षण शिबीर, चर्चासत्रे यामाध्यमातून सांगली आणि परिसरात नागरिकांमध्ये नाट्यविषयक जागृती निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. जानेवारी २०१२ मध्ये सांगली येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे शफी नायकवडी कार्यवाह होते. या संमेलनात त्यांनी आपले संघटन कौशल्य पणाला लावून संमेलन यशस्वी करून दाखवले. त्यांच्या निधनाने रंगभूमीच्या विकासासाठी धडपडणारा सच्चा कार्यकर्ता गमावल्याच्या भावना रंगकर्मीनी व्यक्त केल्या आहेत.
Previous Articleकोल्हापूर : मुद्रांक शुल्कातून दिलासा, रेडिरेकनचा दणका
Next Article आज ‘नीट’ची परीक्षा








