प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील ज्या गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या गावावर लक्ष केंद्रीत करून या गावातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणावी, अशी सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील अधिकारी, पदाधिकाऱ्यांना केली.
इस्लामपूर येथे तहसिलदार कार्यालयात मंत्री पाटील यांनी तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेवून काही सूचना केल्या. यावेळी सभापती शुभांगी पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस,गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.नरसिंह देशमुख, इस्लामपूर मुख्याधिकारी अरविंद माळी, आष्टा मुख्याधिकारी कैलास चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील बोरगाव,साखराळे, पोखर्णी,बावची, वाळवा,कामेरी,रेठरे हरणाक्ष, येडेमच्छिन्द्र, नेर्ले, कापुसखेड, पेठ, रेठरेधरण, ऐतवडे खुर्द, लाडेगाव, ढवळी, शिगाव, बहादूरवाडी या गावात कोरोनाची संख्या वाढलेली दिसते. या गावात पोलीस खात्याने सरपंच, पोलीस पाटील,ग्रामसेवक, कार्यकर्त्यांच्या सहकार्याने निर्बंध वाढवावेत. ग्रामीण भागातील ज्या घरात कोरोना रुग्ण आहेत,त्या घरास स्टिकर लावावे. ते स्टिकर काढून टाकल्यास ते घर सिल करावे. इस्लामपूर,व आष्टा या शहरातील ज्या भागात कोरोना संख्या वाढत आहे,त्या भागात कंटेन्मेंट झोन करावा. यावेळी त्यांनी तालुक्यातील लसीकरण, तसेच इस्लामपूर,व आष्टा शहरातील सीसीटी व्ही व्यवस्थेचा आढावा घेताना ‘मॉर्निंग वॉक’ वाल्याबद्दल काहीशी नरमाई घेण्याच्या सूचना पोलीस खात्यास केल्या.
प्रथम अधिकाऱ्यांनी आप- आपल्या विभागातील कोरोनाची परिस्थिती, सध्या सुरू असलेल्या उपाय-योजनांचा आढावा मांडला. यावेळी उपनगराध्यक्ष दादासो पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अँड.चिमण डांगे,गट नेते संजय कोरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,आष्टयाचे संग्राम फडतरे यांनी काही सूचना केल्या.
यावेळी माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील,उपसभापती नेताजीराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्य क्ष विजय पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील,आष्टयाचे विराज शिंदे, नगरसेवक खंडेराव जाधव,माजी नगरसेवक पिरअली पुणेकर,आयुब हवालदार,शकील जमादार,संदीप माने यांच्यासह तालुक्यातील प्रमुख अधिकारी,पदाधिकारी उपस्थित होते.








