प्रतिनिधी / सांगली
सोमवारी जिल्हय़ात नवीन 301 रूग्ण वाढले तर 146 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 11 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील नऊ जणांचा आणि परजिल्हय़ातील दोघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 230 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे. दरम्यान शहरातील काँग्रेसच्या नेत्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
महापालिका क्षेत्रात 174 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात सोमवारी 174 रूग्ण वाढले. त्यामध्ये सांगली शहरात 85 तर मिरज शहरात 89 रूग्ण वाढले आहेत. सोमवारी सांगली शहरापेक्षा मिरज शहरात रूग्ण संख्या वाढली आहे. सध्या जे रूग्ण वाढत आहेत. ते रूग्णांच्या संपर्कात आलेले त्यांचे नातेवाईक आहेत. तसेच रूग्णांच्याबरोबरचे सहकारी आहेत. सोमवारी जे रूग्ण वाढले आहेत. ते गावभाग, खणभाग, विश्रामबाग, शंभरफुटी,हनुमाननगर, शामरावनगर, एमएसईबी रोड, गर्व्हेमेंट कॉलनी, विजयनगर , शिंदे मळा, सांगलीवाडी, अभयनगर, सहय़ाद्रीनगर, गुलमोहोर कॉलनी, हरीपूर रोड या भागातील हे रूग्ण आहेत. तर मिरजेत जे रूग्ण आढळून आले आहेत. ते गावठाणसह विविध उपनगरातील आहेत. भारतनगर, जीएमसीएच, साईनाथ पार्क, इंदिरानगर, बेथेलहेमनगर, मंगळवार पेठ, नदीवेस याठिकाणी आढळून आले आहेत. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात मात्र आजअखेर एकूण रूग्णसंख्या चार हजार 92 झाली आहे.
ग्रामीण भागात 127 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात मात्र महापालिकेपेक्षा कमी रूग्ण आढळून आले त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 21, जत तालुक्यात सहा, कडेगाव तालुक्यात एक रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात चार, खानापूर तालुक्यात 13, मिरज तालुक्यात 37 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 10, शिराळा तालुक्यात एक, तासगाव तालुक्यात पाच आणि वाळवा तालुक्यात 29 रूग्ण वाढले आहेत. असे एकूण ग्रामीण भागात 127 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील नऊ जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील नऊ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 53 वर्षीय व्यक्तीचा मिरज चेस्ट रूग्णालयात तर 61 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिरजेतील दोन व्यक्तीचा मृत्यू झाला त्यामध्ये 57 आणि 85 वर्षीय व्यक्तीचा मिरज कोरोना रूग्णालयात येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील 78 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबक येथील 70 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला वाळवा तालुक्यातील कामेरी येथील 75 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. तर जत येथील 60 वर्षीय व्यक्तीचा घाटगे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. इस्लामपूर येथील 52 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. या नऊ व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 230 झाली आहे. परजिल्हय़ातील दोघांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्हय़ातील शिरढोण येथील 53 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालय येथे मृत्यू झाला. तर कागवाड येथील 47 वर्षीय व्यक्तीचा अदित्य हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. परजिल्हय़ातील 67 जणांचे आजअखेर मृत्यू झाले आहेत.
आज अखेर साडेतीन हजार रूग्ण कोरोनामुक्त
सोमवारी जिल्हय़ात उपचार सुरू असणारे 146 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग सहाव्या दिवशी मोठय़ासंख्येने रूग्ण बरे झाल्याने रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या तीन हजार 576 झाली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढतच चालली आहे.
काँग्रेसच्या नेत्या पॉझिटिव्ह
शहरातील काँग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी दिली.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 6760
बरे झालेले 3576
उपचारात 2954
मयत 230