रूग्णसंख्येच्या प्रमाणात ‘रेमडेसिवीर’चा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी ही 15 मे पर्यंत असणार आहे. या कालावधीत कोणीही रस्त्यावर येऊ नये असे आवाहन, पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. केंद्राकडून राज्यांना रूग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिवीर पुरवठा करावा अशी मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. लसीकरणामध्ये प्राधान्याने दुसरा डोस देण्यात यावा असे आदेशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम (व्हीसीव्दारे), खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत (व्हीसीव्दारे), आमदार अरूण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे उपस्थित होते.
जिल्ह्याला 30 व्हेंटिलेंटर मिळणार
पालकमंत्री पाटील म्हणाले, जिह्याला दोन दिवसांमध्ये 30 व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार असून राज्य शासनाकडे आणखी 20 ते 25 व्हेंटिलेटर्सची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जिह्याला आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर्सची त्वरित खरेदी करण्यात येणार आहे. लोकांचा जीव महत्वाचे आहेत. त्यामुळे लोकांच्या जीवाला सर्वोच्च प्राधान्य देऊन या व्हेंटिलेंटरची तात्काळ खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.
दुसरा डोस वेळेत द्यावा
जिल्ह्यात आत्तापर्यंत 5 लाख 98 हजार 386 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस 5 लाख 17 हजार 92 तर दुसरा डोस 80 हजार 794 जणांचा झाला आहे. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, अशांना तात्काळ वेळेत दुसरा डोस प्राधान्याने द्यावा. त्यासाठी आवश्यक असणारे लसीकरणाचे डोस मिळविण्यासाठी आपले शासनाकडे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायतीत नोंदी करून जेवढे डोस उपलब्ध आहेत तेवढÎाच लोकांना लसीकरणासाठी बोलवावे व गर्दी टाळावी. असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
30 टक्के नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह
जिल्ह्यात प्रतिदिन सहा हजारहून अधिक कोरोना चाचण्या होत असून यामधील साधरणत: 30 टक्के नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्याच्या भूमिकेनुसार 15 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन एप्रिल पासून भरती सुरू असून आत्तापर्यंत जवळपास 84 मेडिकल ऑफिसर, 360 स्टाफ नर्स, 159 लस टोचक, 32 डाटा एन्ट्री ऑपरेटर, 16 लॅब टेक्नीशियन आदी अशी 500 हून अधिक पदांची भरती करण्यात आली आहे. अजूनही आवश्यकतेनुसार भरती प्रक्रिया सुरू आहे.
जिल्ह्याला सध्या प्रतिदिन 44 मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर झाला असून सदरचा ऑक्सिजन जेमतेम पुरविण्यात येत आहे. ऑक्सिजन पुरवठा व रेमडेसिवीर पुरवठा या दोन बाबींचे फार मोठे आव्हान असून राज्यांना रूग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिवीरचा पुरवठा व्हावा अशी मागणी केंद्राकडे करण्यात आल्याचेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
सिव्हिलच्या नवीन 500 बेडच्या हॉस्पिटलसाठी प्रयत्न सुरू
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, मिरज मेडीकल कॉलेज येथे तात्काळ 30 आयसीयू बेड्स वाढविण्यात येत आहेत. याशिवाय सांगली सिव्हिल हॉस्पीटल येथे 500 बेड्सच्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त हॉस्पिटलच्या उभारणीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाबरोबर चर्चा सुरू आहे. तात्काळ याला मंजुरी मिळाली की या बांधकामालाही प्रारंभ होणार आहे. लवकरच हे हॉस्पिटल व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.








