एक लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात लसीकरण मोहीम गतीमान झाली असून पहिला डोस १ लाख ८३२ जणांनी घेतला आहे तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या १५ हजार ७१० झाली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज सांगलीत कोरोना आढावा घेतला व संबंधित नागरिकांनी भिती न बाळगता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले.जिल्ह्यात १ हजार ३ रूग्ण उपचाराखाली असून त्यापैकी १८१ रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर ८२२ रूग्ण गृह अलगीकरणामध्ये आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाच हॉस्पीटलमध्ये कोरोना अनुषंगिक उपचार सुरू आहेत.
वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येत्या काळात आणखी रूग्णांना हॉस्पीटलायझेशनची गरज भासू शकते. ही बाब लक्षात घेवून शासकीय रूग्णालयांसह खाजगी रूग्णालयांमध्येही कोरोना विषयक उपचारांची आवश्यक तजवीज ठेवावी. पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. अशा सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.








