प्रतिनिधी / सांगली
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात एक जूनपर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या काळात पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. संचारबंदी लागू असल्याने किराणा, दूध, फळे, भाजीपाला यांना घरपोच सुविधांसाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
१९ मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत बुधवारी सकाळी सात वाजता संपत आहे. परंतु या कडक लॉकडाउनच्या काळातही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. रुग्णसंख्या स्थिर असली तरी पॉझिटिव्हिटी रेट वीस ते २२ टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जिल्हा रेडझोनमध्ये आहे.
जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवण्याची चर्चा यापूर्वीच सुरू झाली होती. पालकमंत्री जयंत पाटील यांनीही तसे दोन दिवसापूर्वीच संकेत दिले होते. याचा निर्णय आज झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत दि. १९ मे २०२१ ते दि. २६ मे २०२१ रोजीचे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. आता ते १ जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
- हे राहणार सुरू
- दुध विक्री केंद्रे सकाळी ७ ते ९ पर्यंत सुरु राहतील.
- किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते, पशुखाद्य यांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्यास परवानगी.
- शेतीविषयक सेवा व शेतीसाठी आवश्यक असणारी बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरु राहतील.
- हे राहणार बंद
- जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी लागू राहीृ
- जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४लागू करण्यात आले आहे.
- वैध कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी
- अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहतील








