जिल्ह्यासाठी 1 लाख 70 हजार कोरोना लसीचे डोस प्राप्त
प्रतिनिधी / सांगली
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात उद्या, (दि. १५) रोजी 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी महालसीकरण अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत सुमारे 1 लाख 50 हजार इतके कोरोना लसीचे डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे लसीकरण सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात महालसीकरण अभियान तयारी आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीव्दारे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत मुख्याधिकारी, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, महालसीकरण अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यात 600 लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात 194 लसीकरण केंद्रे, ग्रामीण भागात 350, शहरी भागात 56 लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. लसीकरणाठी आवश्यक असणारा सर्व स्टाफ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आशा वर्कर्स, एनएनएम, जीएनएम, नर्सेस, वैद्यकिय अधिकारी, लसटोचक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लसीकरण केंद्रावर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नियोजन करण्यात आले असून अधिकच्या सुरक्षिततेसाठी एनएसएस, एनसीसी यांची प्रसंगानुरूप मदत घेण्यात यावी. लसीकरण महाअभियान यशस्वी करण्यासाठी सर्वच घटकांनी समन्वयाने व युध्दपातळीवर काम करून हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन ही केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








