प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या सिताराम कुंटे यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गुरूवारी पहिल्याच बैठकीत जिल्ह्याचे वर्षानुवर्षे रखडलेले विविध प्रकल्प मार्गी लावत तब्बल ११३ कोटींचा निधी मंजूर केला.
राज्याच्या मुख्य सचिवपदी कुंटे यांची नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्या अपेक्षांची पूर्तीही कुंटे यांनी तत्काळ सुरू केली असल्याचे चित्र गुरूवारी अनुभवाला आले. कुंटे यांनी गुरूवारी मंत्रालयात उच्चाधिकार समितीची बैठक घेतली होती. त्यापूर्वीच त्यांनी अपेक्षेप्रमाणे सांगली जिल्हÎातील प्रलंबित फाईल्सची माहिती मागवून घेतली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे लक्ष या बैठकीकडे लागले होते.
राज्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे आणि राज्यातील मोठे प्रकल्प मार्गी लावणे या कामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगत कुंटे यांनी पहिल्याच बैठकीत आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली आहे.
सांगली, कोल्हापूर आणि सीमभागातील हजारो रूग्णांचा आधार असलेल्या सांगली शहरातील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय परिसरात महिला आणि नवजात बालकांसाठी 200 खाटांच्या हॉस्पिटलची मागणी होती. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असणाऱया 29 एकर जागेवर या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी 2013 साली मंजुरी मिळाली होती. निधीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांसह लोकप्रतिनिधीकडूनही पाठपुरावा सुरू होता. पण निधी उपलब्ध होत नसल्याने फाईल रखडली होती.
गुरूवारी झालेल्या पहिल्याच बैठकीत मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी याच्या 45 कोटी 93 लाख रूपये खर्चाला प्रशासकीय मंजूरी दिली. 200 खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये (तळमजला आणि 2 मजले असे 7 हजार 663 चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम) जिल्हा रूग्णालय व पोस्टमार्टम रूम बांधकाम करणे, याशिवाय 46 कोटी 73 लाख रूपये अंदाजित खर्चाचे 100 खाटांचे महिला नवजात शिशु रूग्णालय व धर्मशाळा बांधकाम करणे (तळमजला व 2 मजले असे 8 हजार 786 चौरस मीटर क्षेत्रफळाचे) ची कामे मंजूर केल्याने सदरची कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यासाठी आ. सुधीर गाडगीळ यांनी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू केला होता.
आटपाडी रूग्णालयाचे विस्तारीकरण
आटपाडी शहरात असणारे तीस खाटांचे हॉस्पिटल कमी पडत होते. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता येथे तीसाचे 50 खाट करावेत अशी मागणी गेल्या सात ते आठ वर्षापासून सूरू होती. मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्याबरोबर गुरूवारी झालेल्या बैठकीत या रूग्णालयाचा प्रश्नही मार्गी लावला. ग्रामीण रूग्णालय आटपाडी येथील 30 खाटांवरून 50 खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयात 20 कोटी 62 लाख रूपये खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशा रखडलेल्या विविध प्रकल्पांच्या एकूण 113 कोटी 28 लाखांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता कुंटे यांनी दिली आहे. सांगलीच्या या सुपुत्राने पहिल्याच बैठकीत दिलेल्या या भेटीने जिल्हÎाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
अनेक वर्षापासून केलेल्या पाठपुराव्याला यश : आमदार गाडगीळ
सांगलीतील या दोनशे खाटांच्या हॉस्पिटलसाठी आपण अनेक वर्षापासून पाठपुरावा करत होतो. पण राज्यातील सरकार बदलल्यामुळे मंजुरी मागे पडली होती. मुख्य सचिवपदी सिताराम कुंटे यांची नियुक्ती झाल्यानंतर पुन्हा प्रयत्न सुरू केले. बुधवारीच त्यांना भेटून आपण मुख्य सचिवपदी नियुक्तीच्या शुभेच्छा दिल्या. सांगलीतील शंभर हॉस्पिटलची फाईल मार्गी लावण्याची विनंती केली. गुरूवारच्या बैठकीत निधीसाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याने आपल्या पाठपुराव्याला यश आले असल्याची माहिती आ. सुधीर गाडगीळ यांनी दिली.








