उपाध्यक्षपदासाठी जयश्रीताई, पृथ्वीराज पाटील यांच्या नावांची चर्चा : आज निवड
सांगली / प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिराळयाचे राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. उपाध्यक्षपद काँग्रेसकडे गेले असून या पदासाठी जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम उपाध्यक्षपदाचे नाव रात्री उशीरा निश्चित करणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. आज अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडी होणार आहेत.
पहिली तीन वर्षे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर दोन वर्षे काँग्रेसकडे देण्याबाबतही निर्णय झाला असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा बँक निवडणुकीत महाआघाडीचे 17 तर भाजपचे 4 उमेदवार निवडून आले आहेत. सहकार प्राधिकरणाच्या आदेशानुसार आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होणार असून यासाठीचा कार्यक्रम सहकार विभागाने जाहिर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद मिळणार आहे. अध्यक्ष पदासाठी आ. मानसिंगराव नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले.
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू पाटील यांनीही अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डींग लावली होती. मात्र गेल्या काही वर्षापासून अध्यक्षपदाला हुलकावणी मिळाल्याने आ. नाईक यांच्या गळ्यात पडणार असल्याचे स्पष्ट दिसते. पालकमंत्री जयंत पाटील यांनीही आ. नाईक यांच्या नावाला हिरवा कंदील दर्शवला आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या संचालकांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे समजते.
उपाध्यक्षपद काँग्रेसला मिळणार आहे. जयश्रीताई मदन पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय महेंद्र लाड, पृथ्वीराज पाटील हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मात्र पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. मात्र त्याबाबतचा अधिकृत निर्णय सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडून जाहीर केला जाईल.








