सांगली / प्रतिनिधी
अख्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 85.31 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत बँकेसाठी तब्बल 95 टक्के मतदान झाले होते. या वेळी दहा टक्के मतदान कमी झाले आहे.
सकाळी आठ ते पाच या वेळेत जिल्ह्यात मतदान पार पडले. विकास महाआघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी थेट लढत झाली असून 23 रोजी मिरजेत मतमोजणी होणार आहे. विकास महाआघाडीच्या तीन जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 18 जागापैकी पाच ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दोन्ही बाजूकडून विजयाचा दावा केला जात असून निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान सांगलीमध्ये सर्वात कमी मतदान झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.








