प्रतिनिधी / सांगली
शुक्रवारी जिल्हय़ात नवीन 280 रूग्ण वाढले तर 241 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 21 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 17 जणांचा आणि परजिल्हय़ातील चौघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 293 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 146 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात शुक्रवारी कोरोनाचा कहर सुरूच असलेला दिसून आला. 146 नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 71 तर मिरज शहरात 75 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात सातत्याने रूग्ण वाढत चालल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेकडून वाढत्या रूग्णसंख्येला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेने अदिसागर मंगल कार्यालय येथे नवीन रूग्णालय सुरू केले आहे. पण तरीही सातत्याने रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. त्यामध्येच महापालिकेकडून रॅपीड ऍण्टीजन टेस्ट मोठय़ाप्रमाणात सुरू करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मोठय़ाप्रमाणात रूग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी 82 रूग्ण हे ऍण्टीजन टेस्टमध्ये आढळन आले आहेत. तसेच सध्या जे रूग्ण वाढत आहेत. ते रूग्णांच्या संपर्कात आलेले हायरिस्क नातेवाईक आहेत. तसेच रूग्णांच्याबरोबर काम करणारे त्यांचे सहकारी आहेत. शहरातील गावठाणसह विविध उपनगरात हे रूग्ण आढळून आले आहेत. मिरजेत नवीन 75 रूग्ण वाढलेले आहेत. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात मात्र आजअखेर एकूण रूग्णसंख्या चार हजार 749 झाली आहे.
ग्रामीण भागात 134 रूग्ण वाढले
शुक्रवारी ग्रामीण भागातही मोठय़ासंख्येने रूग्ण वाढले आहेत. नवीन 134 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात पाच, जत तालुक्यात 12, कडेगाव तालुक्यात आठ रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात चार, खानापूर तालुक्यात 17, मिरज तालुक्यात तब्बल 38 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात एक, शिराळा तालुक्यात दोन, तासगाव तालुक्यात 25 आणि वाळवा तालुक्यात 22 रूग्ण वाढले आहेत. असे एकूण ग्रामीण भागात 134 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 17 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 17 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 72 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 70 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. 60 वर्षीय व्यक्तीचा अदित्य हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. मिरजेतील पाच व्यक्तीचा मृत्यू झाला 64 वर्षीय व्यक्तीचा मिरज कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 70 वर्षीय व्यक्तीचा आणि 46 वर्षीय महिलेचा वानलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. 67 आणि 70 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. मिरज तालुक्यातील बुधगाव येथील 65 वर्षीय व्यक्तीचा, तर तुंग येथील 62 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हरीपूर येथील 55 वर्षीय महिलेचा श्वास हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. सावळवाडी येथील 75 वर्षीय व्यक्तीचा वानलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. म्हैसाळ येथील 49 वर्षीय व्यवतीचा वानलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील 44 वर्षीय व्यक्तीचा घाटगे हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. इस्लामपूर येथील 77 वर्षीय व्यक्तीचा सिनर्जी हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. वाळवा येथील 70 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. जत तालुक्यातील माडग्याळ येथील 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. या 17 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 293 झाली आहे.
परजिल्हय़ातील चौघांचा मृत्यू
शुक्रवारी परजिल्हय़ातील चौघांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्हय़ातील जयसिंगपूर येथील 79 वर्षीय व्यक्तीचा विवेकानंद हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. शिरोळ येथील 80 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. तर रत्नागिरी येथील 67 वर्षीय व्यक्तीचा सिनर्जी हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. अथणी येथील 42 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. परजिल्हय़ातील 83 जणांचे आजअखेर मृत्यू झाले आहेत.
साडेचार हजार रूग्ण कोरोनामुक्त
शुक्रवारी जिल्हय़ात उपचार सुरू असणारे तब्बल 241 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग दहाव्या दिवशी मोठय़ासंख्येने रूग्ण बरे झाल्याने रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या चार हजार 577 झाली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढतच चालली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 8022
बरे झालेले 4577
उपचारात 3152
मयत 293








